मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटता येणार नाही. याबद्दल स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असे ते यावेळी म्हणाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून म्हटलं होतं की, अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटून द्यावं.
यावर स्पष्टीकरण देताना अनिल देशमुख म्हणाले की, कोरोना महामारीमुळे गेल्या ४ महिन्यांपासून कैदी आपल्या नातेवाईकांना भेटलेले नाहीत. राज्यपाल कोश्यारी यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले की, अर्णब यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू द्यावं, पण कोरोनाकाळात तुरुंगात कैद्यांना भेटण्यास बंदी आहे. पण अर्णब यांचे कुटुंबिय फोनवरून बोलणी करू शकतात. अर्णब यांची काळजी करण्याची गरज नाही ते सुरक्षित आणि सुस्थितीत आहेत असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकारण तापलेले आहे. भाजपच्या नेत्यांकडून सतत राज्य सरकारवर हल्ला चढवला जात आहे. त्यामुळे दिल्लीपर्यंत राजकारण तापलेले आहे. राज्य सरकार सुडाच राजकारण करत असल्याचे टीका केली जात आहे.
* शरद पवारांचा राज्यपालांना टोला
राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटतं की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.