नवी दिल्ली : रामदेव बाबांकडून अनेकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमने उधळली जातात. असेच पुन्हा एकदा एका मुलाखतीमध्ये योगगुरु रामदेव बाबांनी पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही असं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे पुढची १० ते २० वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा, असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं आहे.
त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की देशात मोदी फॅक्टर आहे का? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की, “कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सगळ्या देशाला हे ठाऊक आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळालं आहे. ” असंही बाबा रामदेव म्हणाले. इतकंच नाही तर भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या १० ते २० वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असं दिसत नाही.
तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर होतो असं जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे. असं उत्तर बाबा रामदेव यांनी दिलं.