नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांकडून काल सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे.
या घटनेनंतर दिल्लीतील पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून दिल्लीतील आणखी काही भागांमध्ये छापे टाकले जाण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी काल रात्री छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली. हे दोन्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रहिवाशी असल्याचे समजते. अब्दुल लतीफ मीर आणि मोहम्मद अश्रफ अशी त्यांची नावे असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना पकडण्यासाठी सराय काले खा येथील मिलेनियम पार्क परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास हे दोघे तिकडे आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.