लाहौल : उत्तर भारतात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. अशात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमधील लाहौल खोऱ्यातील थोरंग गावात एक व्यक्ती सोडून इतर सर्वजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे.
त्या सर्वांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मनाली-लेह महामार्गावर असलेल्या थोरंग गावात केवळ 42 लोक राहतात. ज्यावेळी गावातील सर्वांनी कोरोनाची चाचणी केली, त्यावेळी त्या गावातील 42 लोकांपैकी 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
सर्वात आधी 52 वर्षांच्या भूषण ठाकूर यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील इतरांनीही कोरोना चाचणी केली. त्यानंतर केवळ एक व्यक्ती सोडून गावातील इतर सर्व व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे सध्या लाहौल हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक कोरोना बाधित असलेला जिल्हा बनला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लाहौल खोऱ्यातील वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. रोहतांग सुरंगच्या उत्तरेकडील तेलिंग पर्यंतच पर्यटकांना येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.हिमाचल प्रदेशमध्ये याआधी लाहौल-स्पीति जिल्ह्यातील सुदूर स्पीति घाटीमध्ये रंग्रिकच्या 39 रहिवाशांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी गावाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या.
दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये गुरुवारी कोरोनाच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 481 वर पोहोचला आहे. तर 796 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा 32,198 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कांगडा-कुल्लूमध्ये तीन-तीन, मंडी-शिमलामध्ये प्रत्येकी दोन आणि ऊना व बिलासपूरमध्ये प्रत्येकी एका-एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.