सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता योग्य ती खबरदारी घेत आज सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होत असून, शिक्षकांची ‘रॅपिड अटीजन’ व ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येत आहे. यात 178 शिक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत.
दरम्यान, पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक असून, पालकांनी मात्र याला अल्प प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा-महाविद्यालये सोमवारपासून एक दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 87 शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या वर्गांवर शिकविणाऱ्या 14 हजार 205 शिक्षकांची तपासणी झाली असून, त्यांपैकी 178 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विषय शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
* 10 हजार 799 शिक्षकांची अन्टीजेन टेस्ट
जिल्ह्यातील 10 हजार 799 शिक्षकांची रॅपिड अॅटीजेन टेस्ट करण्यात आली. यांतील 176 कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर तीन हजार 406 शिक्षकांची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात आली असून, त्यात दोनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील 1 हजार 199 शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले असून, 330 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात एकही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. अद्यापि 869 शिक्षकांचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित शिक्षक पंढरपूर (66), तर सर्वाधिक कमी अक्कलकोट (2) येथे आढळले आहेत.