हैदराबाद : काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयशांती लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या जवळच्या लोकांकडून ही माहिती मिळाली आहे. या आधी अभिनेत्री खुशबू यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ अभिनेत्री विजयाशांतीही काँग्रेसचा हात सोडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना त्या उपस्थित राहत नव्हत्या. जर विजयशांती भाजपमध्ये सहभागी झाल्या तर त्या दक्षिण भारतामधून भाजपमध्ये सहभागी होणाऱ्या दुसऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ठरतील.
विजयशांती यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचं स्थानिक बळ वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाजपमध्ये येण्यामुळे हैदराबादेतील स्थानिक निवडणुकांमध्ये चुरस वाढणार आहे. डिसेंबरमध्ये या निवडणुका होणार आहेत. विजयशांती यांनी राजकीय क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं ते भाजपच्याच साथीने. त्यानंतर त्या टीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर 2014 साली विजयशांती यांनी काँग्रेसचा हात धरला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
1 डिसेंबरमध्ये हैदराबादमधील स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि 4 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. ऐन निवडणुकीच्या हंगामामध्ये विजयशांती काँग्रेसला रामराम करणार असल्याने त्याचा काँग्रेसच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्या नाराज होत्या. अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. विजयशांती यांच्यासोबतच अनेक नेते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.