ब्युनोस आयरिस : जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे आज बुधवारी रात्री निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, दिएगो मॅराडोना यांना हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जगभरातील फुटबॉल रसिकांचे आवडते खेळाडू म्हणून दिएगो मॅराडोना यांचे नाव घेतले जाते. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांतून समोर येत आहे.
दिएगो मॅराडोना हे फुटबॉल विश्वातील सार्वकालिन महान खेळाडुंपैकी एक होते. दिएगो मॅराडोना यांनी आपल्या कौशल्याने फुटबॉलविश्वात अर्जेंटिनाच्या संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांनी चार विश्वचषक स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 1986 मध्ये दिएगो मॅराडोना यांच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने विश्वचषक जिंकला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फुटबॉलविश्वात अनेक नव्या खेळाडुंसाठी मॅराडोना हे आदर्श होते. त्यांना फिफाचा प्लेअर ऑफ दी सेंचुरी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध केलेला गोल ‘हॅड ऑफ गॉड’ म्हणून ओळखला जातो. तर त्याच सामन्यात सहा खेळाडूंच्या मधून चेंडू बाहेर काडून केलेल्या गोलला ‘द गोल ऑफ द सेंचुरी’ असे म्हटले जाते.
दिएगो मॅराडोना मैदानाबाहेरही अनेक कारणांमुळे गाजले. 1991 साली डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर मॅराडोना यांना 15 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. 2008 मध्ये ते अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाले होते.