सोलापूर : बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून चोरट्यांनी 11 लाख 42 हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. कुर्डुवाडी-माढा रस्त्यावर ही घटना घडली आहे.
बँक ऑफ इंडिया कुर्डुवाडी शाखेचे एटीएम फायनान्शियल सिस्टिम सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आहे. सोमवारी दुपारी सीएमएसच्या आश्रम बेडकुते (रा. वरकुटे, ता. करमाळा), अनिल भाग्यवंत (रा. झरे, ता. करमाळा) यांनी बँकेच्या कुर्डुवाडी शाखेतून 5 लाख रुपये या एटीएममध्ये भरले होते.
चोरट्यांनी 2 हजाराच्या 6 नोटा, 500 रूपयाच्या 2,253 नोटा, 100 रूपयांच्या 35 नोटा चोरून नेल्या.एटीएम मशीनचेही 25 हजाराचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री 12 ते पहाटे 5 च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या एटीएमच्या दरवाज्यातून आत जाऊन मशीनचे समोरील बाजूचे लॉक गॅस कटरच्या साहाय्याने तोडून आतील रोकड चोरट्यांनी चोरुन नेली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चोरट्यानी पहाटेच्या दरम्यान एटीएमचे लॉक गॅस कटरच्या साहाय्याने तोडून आतील 11 लाख 42 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी स्वच्छतेसाठी आलेल्या अरविंद जगताप (रा.कुर्डुवाडी) यांना चोरी झाल्याचे दिसून आले त्यांनी बँक ऑफ इंडियाचे कुर्डुवाडी शाखाप्रबंधक उदय काकपुरे यांना सांगितले. काकपुरे यांनी पोलिसांना ही घटना कळवली. याबाबत सचिन सुखदेव चौधरी (रा. शिरोळे, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.