मुंबई : कोरोना काळात वाढीव वीजबिलं आल्यानं नागरिकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढीव वीजबिलाच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज रस्त्यावर उतरत आवाज उठवला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारविरोधात गर्जना केली आहे. “या सरकारनं वीज देयकांतून जिझिया कर लावून लूट सुरू केली आहे,” अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे.
वाढीव वीजबिलांच्या मुद्यावरून राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनं केलं. यावेळी राज ठाकरेंनी लिहिलेलं निवेदन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या निवेदनात राज ठाकरे यांनी सरकारच्या वाढीव वीजबिला संदर्भातील भूमिकेचा समाचार घेतला आहे.
राज्य सरकारचे जिल्हा पातळीवरचे सर्वोच्च प्रतिनिधी या नात्याने माझे महाराष्ट्र सैनिक महाविकास आघाडी सरकारला आपणामार्फत हे निवेदन देत आहेत. करोनाच्या काळात माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सरकारचे डोळे उघडावे यासाठी रस्त्यावर उतरून, मोर्चा काढून संघर्ष करायला लागावा, है दुर्दैवी आहे. पण सरकारला आर्जंवांची भाषा समजत नाही. त्यामुळे आता मोर्च्याच्या भाषेत समजावयाची वेळ आमच्यावर आली आहे.”
कोरोनाचा काळ कठीण आहे हे लक्षात घेऊन आम्ही सरकारच्या बाजूने ठाम उभे राहिलो. पण. हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शॉक देणार असेल, तर मग आम्हाला पण जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. ही असली मनमानी आम्ही खपवून घेणार नाही.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे, काही झालं तरी ही वाढीव वीज देयकं भरू नका आणि हा असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारलाही जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकार तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही आणि जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांचा संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा. कोरोनाचं संकट अजून ओसरलेलं नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील. सरकारच्या निर्बंधांचं पालन सगळेच कसोशीनं करायचा प्रयत्न करत आहेत पण म्हणून सरकारनं जनतेला गृहीत धरू नये.
* ऊर्जामंत्री, राज्यपालांनाही भेटलो
“या विषयावर माझ्या पक्षातील नेत्यांनी सन्मानीय ऊर्जामंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे जनतेचं गाऱ्हाणं मांडलं. जनतेला या कठीण परिस्थितीत लुटू नका, असं आर्जव केलं. पण या विषयावर काहीतरी सकारात्मक पाऊल सरकार उचलेल असं नेहमीच थातुरमातुर उत्तर त्यांनी दिलं. या पलिकडे काहीच घडलं नाही. पुढे आम्ही राज्यपालांपर्यंत देखील हा नेला. त्यांना या विषयातील गांभीर्य जाणवत होतं. पण त्यांनी देखील या विषयात सरकार काही करत नाही, याचं दुःख व्यक्त केलं. त्यात १०० युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ अशी भाषा करणारे ऊर्जामंत्री घुमजाव करून वीज देयक भरलंच पाहिजे आणि कोणतीही सवलत मिळणार नाही, अशी भाषा बोलू लागले आणि आमचा संयम सुटला.
“आम्हाला संघर्ष जरी नवीन नसला तरी ही वेळ संघर्षाची नाही, याचं भान सरकारनं देखील बाळगावं आणि उगाच वाढीव वीजदेयकं पाठवून संघर्ष करू नये. या विषयावर समंजस भूमिका घेत, वीजदेयकांत सवलत देत नागरिकांना दिलासा द्यावा, हीच सरकारला विनंती,”
– राज ठाकरे, मनसे अध्यक्ष