सोलापूर / पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी त्यांच्या मूळगाव गावी सरकोलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी अंत्यसंस्काराला मोठा जनसमुदाय उपस्थित राहिला होता. आमदार भारत भालके यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेत नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भारतनानांचे नेतृत्व हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरुप झालेले नेतृत्व होते. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता.
पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारे त्यांचे नेतृत्व होते. भारतनाना भालके यांचे अचानक निघून जाणे ही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी कॉंग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दांत त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या. दरम्यान, भारत भालके यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची पुण्यात प्राणज्योत मालवली.
* शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
शरद पवारांनी ट्विटरवर भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!
* एक धाडसी लोकनेता हरपला : पालकमंत्री
आमदार भारतनाना भालके आणि आम्ही विधानसभेत एकत्र काम करीत होतो. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा जनसंपर्क होता. मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. लोकांच्या विकासासाठी ते तळमळीने काम करीत होते. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ते नेहमीच सर्वांच्या पुढे असायचे. त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. एक धाडसी लोकनेता हरपल्याचे आम्हाला दु:ख आहे.’