मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आज मंगळवारी दुपारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते तिने हाती शिवबंधन बांधून घेतलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. हातात भगवा घेतल्यानंतर तिने बाळासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं.
त्यानंतर दुपारी 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश घेतला.
मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस कडून विधान परिषदेतील आमदारकीची ऑफर का नाकारली हे सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मागील वर्षी लोकसभेनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसमधून बाहेर पडल्या होत्या. “मी काही वेगळ्या मुद्यावरून काँग्रेस सोडली होती. पदासाठी कोणताच मुद्दा नव्हता. या वेगळ्या मुद्दयामुळे मी यावेळी काँग्रेसकडून आमदारकी स्वीकारली नाही. असे स्पष्टीकरण अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.
सध्या देशाच्या राजकारणात विषारी राजकारण सुरू झाले आहे. हे विषारी राजकारण देशातून बाहेर काढायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे. सेक्युलर म्हणजे इतर धर्मांना विरोध आणि त्यांचा तिरस्कार करणे नाही. मी हिंदू आहे. जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. त्यामुळे धर्म हा आस्थेचा विषय आहे, असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
* कंगनाबद्दल जास्त बोललं गेलंय
कंगना राणावत सातत्याने शिवसेनेवर व महाविकास आघाडीवर टीका करत असतात कंगनाच्या या टीकेला शिवसेनेच्या सदस्या व अभिनेत्री म्हणून उत्तर देणार का? असं प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ ‘नाही’, असं उत्तर दिलं आहे. ‘कंगनावर बोलायला पाहिजे त्यापेक्षा जास्त बोललं गेलंय’, असं त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, ज्या मुलाखतीवरुन कंगनानं उर्मिला यांच्यावर टीका केली होती. त्याबाबतही उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कंगनाला उत्तर देण्यासाठी मी मुलाखत दिली नव्हती. प्रश्नांच्या ओघात कंगनाबद्दल जास्त बोललं गेलं,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, ‘टीका करायला लोकशाही आहे. कंगनालाही अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. या विषयाला नको तितकं महत्त्व दिलं गेलं आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.