सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप अशी ही दुरंगी लढत होत आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी आज मंगळवार सकाळी 8 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे.
या महाविकास आघाडीविरोधात भाजप असा खरा सामना असला तरी या निवडणुकांमध्ये दोन्ही मतदारसंघात अपक्षांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पक्षीय उमेदवारांना अपक्षांचे मोठे आव्हान असणार आहे. बड्या नेत्यांनी उमेदवारांच्या पाठीशी ताकद लावल्याचे दिसून आले. पुणे पदवीधर मतदारसंघात विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील 4 लाख 26 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शिक्षक मतदारसंघासाठी या पाच जिल्ह्यांतून 72 हजार 545 मतदार आहेत. ही निवडणूक एकल मतदान प्रक्रियेनुसार होणार आहे. त्यामुळे मतदारांना संभाव्य उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पदवीधर मतदारसंघात एकूण 62 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, खरा सामना हा तिरंगीच होईल, असा अंदाज बांधला जात आहे. यामध्ये भाजपने सांगलीचे उद्योगपती संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीनेही सांगलीचे अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घटक पक्ष यांच्यात ही निवडणूक होणार आहे.
शिक्षक मतदारसंघातही 35 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत उमेदवार प्रा. जितेंद्र पवार यांच्यात होईल. परंतु माजी आ. दत्तात्रय सावंत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात खर्याअर्थाने तिरंगी लढत होणार आहे.