मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढले. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली.
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येणार आहे.
या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील आजच लागला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबरला राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार कि महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार हे आज कळाल आहे. धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल यांचा दणदणीत विजय झाला आहे. 434 मतापैकी 332 मतं अमरीश पटेल यांना तर काँग्रेसच्या अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत.
राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालं आहे.