सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हा सचिव मंडळ सदस्य, मोची समाज श्रेष्ठी, माजी नगरसेवक कॉ. माशप्पा विटे यांचे आज शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालय येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्या राहत्या घरी बापूजी नगर येथून अंत्ययात्रा निघून मोदी स्मशानभूमी येथे माशप्पा विटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कॉ. माशप्पा विटे हे माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांचे अत्यंत निकटवर्तीय, जिवलग मित्र आणि मानसपुत्र म्हणून ओळखले जात असत. ते मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली 1991 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. यंत्रमाग कामगारांच्या लढ्यात सक्रीय काम केले. स्वतः यंत्रमाग कामगार म्हणून कित्येक वर्षे दत्त नगर आणि एम.आय.डी.सी.त काम केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापुरात भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ वाढीसाठी योगदान दिले. सिटू प्रणित विविध असंघटीत कामगार संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था,कुंभारी चे प्रभारी म्हणूनही काम पाहिले.
1992 साली बापूजी नगर येथे कॉ.नरसय्या आडम मास्तर हे तत्कालीन काँग्रेसचे नेते नागनाथ अलकुंटे यांचा पराभव करून सोलापूर महानगरपालिका निवडणूकीत नगरसेवक म्हणून निवडून आले.
1995 साली कॉ.आडम मास्तर हे शहर दक्षिण मधून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बापूजी नगर येथे पोटनिवडणुक झाली त्यात पहिल्यांदा कॉ.माशप्पा विटे माकपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2002 तदनंतर 2012 साली निवडून आले. असे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.