नवी दिल्ली : कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर शेतकरी संघटनांनी पुन्हा बैठक बोलावून आपसात चर्चा केली. या बैठकीनंतर संयुक्त शेतकरी आघाडीने पत्रकार परिषद घेतली. तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सरकार या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे, मात्र सरकारने हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत अशीच आमची मागणी असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले. आम्ही सरकारशी कालच चर्चा केली आहे आणि हे तिन्ही कायदे मागे घ्यावेत असे आम्ही सरकाला स्पष्टपणे सांगितले आहे, असे सिंधु सीमेवर झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हरिंदर पाल लखोवाल यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकार वीज कायदा आणि पेंढा जाळण्यासंदर्भातील दंडाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य असल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांनी येथे यावे असे आमचे म्हणणे आहे. ही लढाई आरपारची आहे. आम्ही मागे हटणारे नाहीत. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे, असे हरिंदर पाल लखोवाल यांनी सांगितले.
* उद्या पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळणार
या व्यतिरिक्त आम्ही ८ डिसेंबरला संपूर्ण देशात टोल प्लाझा मोफत करणार असून दिल्लीतील उरले सुरले सर्व रस्तेही बंद करणार आहोत, असेही शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. शेतकरी उद्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळाही जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
गेल्या ९ दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणासह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिल्लीला लागून असलेल्या विविध राज्यांच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ‘दिल्ली चलो’ नावाने सुरू झालेले हे आंदोलन आता देशव्यापी बनले आहे. येथे जमा झालेल्या शेतकरी आणि आंदोलकांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच त्यांना मिळणारे समर्थनही वाढतानाच दिसत आहे.