पुणे / सोलापूर : यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. 30 वर्षाचा पुणे विभागातला भाजपाचा दबदबा संपला आहे. गेल्यावेळी लाड यांच्या बंडखोरीमुळेच राष्ट्रवादीला फटका बसला होता.
* सोलापुरात रात्रीच जल्लोष
महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड हे आघाडीवर असल्याने रात्रीच महाविकास आघाडीने सोलापुरात जल्लोष केला होता. प्रचारा बैठकीत फलकावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचा फोटो नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीत गोंधळ घालून नाराजी, निषेध दर्शविला होता. मात्र निवडणुकीत एकदिलाने काम करुन अरुणभाऊंचा काँग्रेसने लाड पुरवले.
पुणे पदवीधर मतदार संघात 1 लाख 21 हजार अशी सर्वाधिक मते घेऊन महा विकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले. तर भाजपाच्या संग्राम देशमुख यांना 70 हजार मते पडली. पदवीधर निवडणुकीत विजयासाठी 1 लाख 15 हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा लाड यांनी पहिल्या पसंती क्रमांक मिळवून पूर्ण केला. लाड हे सकाळी 9 वाजता शरद पवार यांच्या भेटीला गोविंद बागेत जाणार आहेत. तर शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. अधिकृत निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* २ हजारांच्या फरकाने जागा हुकली होती
पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.
* ३० वर्षांपासून भाजपाचा दबदबा
गेल्या ३० वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रतिनिधित्व केले. मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीमध्ये निकराची झुंज झाली आणि चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. यात अरूण लाड यांच्या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला होता.
* नागपूरमध्येही महाविकास आघाडी जिंकली
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पाचही फेऱ्यांत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला.