सोलापूर : ‘ग्लोबल टीचर प्राईज’ प्राप्त केलेल्या बार्शीतील रणजितसिंह डिसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा आज (शनिवारी ) सन्मान केला. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले सरांची आहे. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील फोनद्वारे डिसले गुरुजींचे अभिनंदन केले. राज्याच्या विधीमंडळामध्ये डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरेकर म्हणाले की, राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाल्या. यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो हेच देशाचे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून शिफारशीचे पत्र देऊ असे आश्वासन विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिले.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.