हैदराबाद : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. एमआयएमचे ओवीसींच्या गडात कमळ फुलले आहे. भाजपचे चारवरुन 48 वर नगरसेवक पोहचले आहेत. काँग्रेसचे पानिपत झाले आहे.
वृत्त हाती येण्यावेळी 150 जागांपैकी 149 जागांच्या हाती आलेल्या आकड्यांनूसार ग्रेटर हैदराबाद पालिका निवडणुकीत भाजपाचा 48 जागांवर विजय झाला आहे. तसेच टीआरएसने 55 जागा जिंकल्या असून एमआयएमने 44 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर अजूनही एका जागेचा निकाल हाती आलेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हैदराबादमध्ये 1 डिसेंबरला मतदान झाले होते. यावेळी 46.55 टक्केच मतदान नोंदविले गेले. सत्ताधारी टीआरएस सर्वच्या सर्व 150 जागांवर निवडणूक लढवली होती. तर भाजपाने 149 जागांवर निवडणूक लढवली. तसेच एमआयएम 51 जागांवर निवडणूक लढवली होती.
* गृहमंत्री शहांकडून तेलंगणाचे आभार
भाजपाच्या या यशानंतर गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी ट्विटद्वारे तेलंगणाच्या जनतेचे आभार मानले आहे. अमित शहा यांनी ट्विट करून तेलंगनाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं म्हटलं आहे. तेलंगनाच्या जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वस्व झोकून काम केलं होतं, असं शहा यांनी म्हटलं आहे.
ओवेसींच्या गडात पाय रोवण्यासाठी पहिल्यांदाच भाजपाने महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आले होते.