नवी दिल्ली : 80 च्या दशकातील दक्षिणेतील सुपरस्टार आणि ‘लेडी अमिताभ’ आणि माजी खासदार विजयाशांती यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजयाशांती या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा स्वगृही परतल्याने दक्षिण भारतात भाजपची ताकद वाढणार असल्याचं सांगण्यात येतं.
ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केल्यानंतर विजयाशांती यांनी घरवापसी केली आहे. या आधी काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री खुशबू यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. एकीकडे सुपरस्टार रजनीकांत यांनी सक्रिय राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच विजयाशांती आणि खुशबू सारख्या एकेकाळच्या दक्षिणेतील सुपरस्टार राहिलेल्या अभिनेत्रींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचं बळ वाढलं आहे.
विजयाशांती यांनी 2014 मध्ये टीआरएसचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र काँग्रेसमधील वागणुकीवरून त्या समाधानी नव्हत्या. या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विजयाशांती यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे.
1996 मध्ये विजयाशांती यांनी अखिल भारतीय अन्ना द्रविड मुनेत्र कळघमला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांनी एआयएडीएमकेच्या नेत्या जयललिता यांच्यासाठी प्रचारही केला होता. मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी जानेवारी 2009 मध्ये राजकीय पक्षाची स्तापना केली होती. ‘तल्ली तेलंगना’ नावाने स्थापन केलेल्या या पक्षाला लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी टीआरएसमध्ये हा पक्ष विलिन केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* भाजपमधूनच राजकारणात एंट्री
दक्षिणेतील लेडी अमिताभ म्हणून सुपरिचित असलेल्या विजयाशांती यांनी 1997 मध्ये भाजपमधूनच राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, स्वतंत्र तेलंगनाच्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर त्या टीआरएस प्रमुख केसीआर यांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.
* ‘लेडी अमिताभ’ म्हणून ओळख
1990 च्या दशकात त्या फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होत्या. त्याकाळात एका सिनेमासाठी त्या एक कोटी रुपये मानधन घ्यायच्या. 1990 मध्ये ‘कर्तव्यम’ या तेलुगू सिनेमात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची जबरदस्त भूमिका केली. या भूमिकेसाठी त्यांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट नंतर हिंदीतही डब करण्यात आला होता. त्यानंतर विजयाशांती यांना ‘लेडी अमिताभ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तिन्ही भाषेतील अनेक सुपरस्टार्ससोबत त्यांनी काम केलं.