नागपूर : पदवीधर निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नागपूर पदवीधर मतदार संघातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
पदवीधर निवडणुकीत पराभव स्वीकारत राजीनामा देणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते सध्या माध्यमांपासून अलिप्त आहेत.
भाजप अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना विचारलं असता अद्याप कोणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. त्यामुळे याबद्दल आज दिवसभरात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खरंतर, गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी मोठ्या फरकाने विजयी झाले.
काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. यामुळे संदीप जोशी यांनी पराभव स्वीकारत राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
* आम्ही बेसावध राहिलो
‘महाविकास आघाडीला मतदारांनी स्वीकारलं, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या, हे खरं आहे. त्या गमावणं हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचं चिंतन केलं जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं आहे.
* पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा
नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्याने नागपूरच्या या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा झाली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजयानंतर दिली होती.