मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या प्रत्येक एपिसोडमध्ये हास्याचे फवारे उडत असतात. या कार्यक्रमात मनोरंजन क्षेत्रातील विविध मंडळी हजेरी लावतात. इतर काही क्षेत्रातील मंडळीही या मंचावर येऊन गेली आहेत. मात्र लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका एपिसोडमध्ये राजकीय हास्यकारंजे उडताना दिसणार आहे.
महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप खासदार सुजय विखे पाटील शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार महाराष्टारातील हे युवा चेहरे CHYD च्या मंचावर दिसणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पवार आणि विखे एकाच मंचावर
पवार आणि विखे एकाच मंचावर दिसणार असल्याने राजकीय वाद आणखी वाढणार की हास्याचे कारंजे सर्व वाद काही काळाकरता बाजूला सारणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका नाही पण कोपरखळी तर नक्कीच देतील. सुजय विखे पाटील यांनी कमळ हाती घेतल्यानंतर अशाप्रकारे राजकीय नसणाऱ्या कार्यक्रमात रोहित पवार यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करताना या दोन्ही नेत्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सुजय विखे पाटील देखील त्यांची पत्नी धनश्री विखे यांच्याबरोबर उपस्थित होते.
* पंकजा मुंडेंचा रोख, रोहित पवारांचे प्रत्युत्तर
या मंचावर उपस्थित जोडप्यांना रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा खेळ खेळण्यास सांगितलं होतं. यामध्ये एक वस्तू घड्याळही होती. आश्चर्याची बाब म्हणजे सुजय विखे यांची पत्नी आणि पंकजा मुंडे यांचे पती या दोघांनीही घड्याळावर रिंग टाकली. यावेळी पंकजा मुंडेनी रोहित पवार यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. त्यांनी असं म्हटलं की, तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका. त्यांचा रोख निश्चितच धनंजय मुंडेंवर होता. त्यावर रोहित पवार यांनी देखील चोख उत्तर दिलं आहे. ‘घरच्यांना माहित असतं की आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे’, अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना उत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे यांनी देखील या कार्यक्रमात पती अमित पालवे यांच्याबरोबर उपस्थिती दर्शवली आहे.