मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा काल गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील, असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र या नावाच्या चर्चेवर राष्ट्रवादीने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.
* लक्ष हटवण्यासाठी बातमी पेरली
“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही यावेळी महेश तपास यांनी केली.
“युपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कसं काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही युपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.”
संजय राऊत – शिवसेना नेते