मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली आहे, असं वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोललं की तुरुंगात टाकलं जातं आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवलं जातं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर तोफ डागली.
अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या प्रकरणात खरंतर ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोललं की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचं असे प्रकार सुरु आहेत. तुमच्यावर केस दाखल केली जाईल किंवा जेलमध्ये टाकलं जाईल असं धमकावलं जातं आहे. खरंतर अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि कंगना रणौत प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निकाल हे दोन्ही निकाल सरकारला चपराक देणारे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सरकारला अधिवेशन घेणं निश्चितपणे शक्य होतं. काल शरद पवार यांचा जन्मदिवस झाला त्यावेळी मेळावे झाले ना? आम्हीही मेळावे घेतो आहोत. जर हे सगळं होऊ शकतं तर अधिवेशन एक किंवा दोन आठवडे का घेतलं जात नाही, असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं आहे. कृषी कायद्यांबाबत जे सांगत आहेत की चर्चा झालीच नाही तर त्याला काही अर्थ नाही. कृषी विधेयक जेव्हा राज्यसभेत गेलं तेव्हा चर्चा करा सांगत असताना फक्त नारेबाजी झाली. त्यामुळे आधी नारेबाजी करायची आणि मग सांगायचं की आम्हाला चर्चेला वेळ दिला गेला नाही असं म्हणायचं याला काय अर्थ आहे? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
* ठाकरे सरकार अहंकारी
अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही. मात्र ज्या प्रकारे कारवाई झाली आणि जे कोर्टाने या दोन्ही प्रकरणात जे ताशेरे ओढले आहेत, त्यानंतर या सरकारला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. तरीही यातून सुधारण्याच्या ऐवजी सत्तेचा अहंकार हे सरकार दाखवतं आहे. सत्तेच्या अहंकारातून सरकार कशाप्रकारे वागतं ते आत्ताचं सरकार तेच दाखवून देतं आहे. असं अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कधीही कुठेच चालत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
योग्य ते उत्तर या अहंकाराला आम्ही देऊ. कोणताही संघर्ष करण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. जनतेच्या प्रश्नांवर आणि जनतेसाठी आम्ही सरकारला उत्तर देऊ. हे सरकार अहंकारी आहे. या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहे. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारणारच असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.