सोलापूर : छेडछाडीला कंटाळून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना पंढरपुरात घडली. लष्करात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणीने पंढरपूरमधील आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. पीडित तरुणीला तीन व्यक्तींकडून सतत त्रास दिला जात होता. त्याला कंटाळूनच तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्वप्नाली सत्यवान गाजरे असे मुलीचे नाव आहे. ७ डिसेंबरच्या सकाळी मुलीचा मृतदेह आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली होती. तीन दिवसांनंतर कुटुंबीयाना सुसाईड नोट सापडली. यामध्ये तिने भारतमाता आणि आपल्या आई वडिलांची माफी मागितली आहे. तरुणीने सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावंही लिहिली आहेत.
सुसाईड नोटमध्ये तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने तिचा हात पकडला होता तसंच याबद्दल कुठेही भाष्य करु नको, असं धमकावलं होतं. याशिवाय आरोपी अनेकदा चिडवत असत.
मुलीने आत्महत्या केल्याच्या तीन दिवसांनंतर कुटुंबीयाना सुसाईड नोट सापडली. मुलीने एका वहीत सुसाईट नोट लिहिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये तिने लिहिलं लष्करी गणवेश परिधान करण्याचं आणि त्यावर तिरंगा असण्याचं आपलं स्वप्न सत्यात उतरणार नाही कारण आपण सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत आहोत, अशी माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भामसे यांनी दिली आहे.