पंढरपूर : पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार भारतनाना भालके चिकाटीने पाठपुरावा करीत होते. आजारी असतानाही नानांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. कालच कारखान्याचे व्हाईस चेअरमन व काहीजण मला भेटले व वस्तुस्थिती सांगितली. काळजी करण्यासारखे कारखान्याचे चिञ आहे, माञ थोड्या दिवसात मी परत येणार आहे. सर्वांना सोबत घेवुन कारखान्याला गतवैभव आणू, असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दिले.
आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे सरकोली (ता. पंढरपूर) येथील भगीरथ भालके व कुटुबियांची आज सकाळी त्यांनी भेट घेत सांत्वन केले. यानंतर शोकसभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंञी दत्ताञय भरणे, आ. संजय शिंदे, आ. यशवंत माने, बळीरामकाका साठे, उमेश पाटील, कल्याणराव काळे, दिपक साळुंखे, युवराज पाटील, व्यंकटराव भालके, मोहन कोळेकर, संदिप मांडवे, संतोष सुळे, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, संगिता नागणे, मनोहर सपाटे, मारुती जाधव, आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व भारतनाना भालकेंवर प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
शरद पवार म्हणाले की, नानांचे मतदारसंघातील जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध होते. मतदारसंघातील कामासाठी अखंड धडपड करीत होते. नाना आजारी असताना मी दररोज माहिती घेत होतो. मुंबई – दिल्ली येथील तज्ञ आरोग्य तज्ञांकडे घेवुन जाण्याचा विचार केला. त्यांनी नानांच्या आजारांचा अहवाल मागितला. माञ पुणे येथील डाॅक्टरांनी नानांला हलवणे योग्य नसल्याचा अहवाल दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नानांनी मंगळवेढा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी हट्ट, चिकाटी ठेवली होती. यामुळे त्यांनी आजाराकडे दुर्लक्ष केले. नानांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असेही पवार यावेळी म्हणाले. नाना प्रत्येक वेळी वेगळ्या पक्षातून लढले तरी निवडून आल्यानंतर माझ्याकडे यायचे अन मी आहेच असे हक्काने सांगायचे.
आगामी निवडणुकीत वेगळं काही होणार नाही, त्याची चर्चा करु नका, असेही सांगत अप्रत्यक्षपणे भगीरथ भालके हेच आमदार होतील असे संकेत खा. शरद पवार यांनी दिले.