सोलापूर : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता. 22) केंद्रीय पथक सोलापूर जिह्याच्या दौऱ्यावर येत असून, ते अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि सांगोला तालुक्यांची पाहणी करणार आहे. अॉक्टोबरमध्ये नुकसान झाले असताना दोन महिन्याने पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने नाराजी व्यक्ती होत आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुराने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रभरात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मदतीचा हात मागितला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या पाहणीसाठी तीन पथके पाठविणार आहे. यातील एक पथक संभाजीनगर, धाराशिव येथील पाहणी करून सोलापूर जिह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* प्रत्यक्षात मदत नाही
अतिवृष्टीची सर्वाधिक झळ धाराशिव आणि सोलापूर जिह्यांना बसली होती. या नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाने शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्याची घोषणा केली आणि पहिल्या टप्प्यात 50 टक्के नुकसानीची रक्कम राज्य सरकारने मंजूर केल्याचे वृत्त आहे. मात्र प्रत्यक्षात आणखी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.