सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती ही मालिका शनि. २६ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतेय. या मालिकेला सर्व स्तरातील जाणत्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि सुजाण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ती मध्येच बंद होतेय याचे मनस्वी दु:ख आहे. खरं तर आत्ताशी कुठे मुख्य गोष्टीला सुरूवात झाली होती. मालिका पकडही घेऊ लागली होती.
एरवी कोणतीही मालिका न बघणारे काही जाणते लोक ही मालिका आवर्जून बघतात. एक नवा प्रेक्षकवर्ग मालिकांकडे, सोनी मराठीकडे वळू लागलेला होता. काहीलोक वेळ जुळत नसल्याने अॅपवर ही मालिका बघत होते. पण त्यांची मोजणी टीआरपीमध्ये होत नाही. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत. त्या मुल्यभानाची रसद आणि जगण्याचा पैस विस्तारणारी उर्जा पुरवित असतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा १९-२० व्या शतकातील समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का? कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं अपत्य असते. प्रस्तुत काळ हा जोती-सावित्रीच्या विचारांना, प्रेरणांना, त्यागाला वा ध्येयवादाला फारसा पोषक नाही. ज्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग त्या दोघांनी केला त्या स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. तेच स्वत:च्या इतिहासाबद्दल, पुर्वजांच्या त्यागाबद्दल, वारशाबदल बेपर्वा आणि बेफिकीर आहेत? बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो.
दर्जेदार कंटेण्ट लोकांना हवाच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत.
उंच माझा झोका ही उत्तम मालिका चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३५ नंतर आवरती घ्यावी लागते आणि सावित्री जोती तर मध्येच गुंडाळावी लागते. अशाने या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कोण करील? म्हातारी मेल्याचेही दु:ख आहेच, पण काळ बेदरकारपणे सोकावतोय याचे जास्त दु:ख आहे. काहीजण आम्हाला म्हणाले, “टीआरपी नसला तरी मालिका चालू ठेवा.” कोणतीही मालिका तयार करायला पैसा लागतो, तो ज्या वाहिनीकडून दिला जातो तिला जाहीरातींद्वारे तो परत मिळत असतो. जाहीराती मिळणे न मिळणे हे सर्वस्वी टीआरपीवरच अवलंबून असते. प्रेक्षकांपासून म्हणजेच टिआरपीपासून फटकून राहून मालिका चालू शकत नाहीत ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. सावित्री जोती मालिकेला टिआरपी होता, पण तेव्हढा पुरेसा नव्हता. या मालिकेमागचे आमचे, दशमी व सोनी मराठीचे प्रयत्न प्रामाणिक होते. उत्तम टिम आणि ऑनेस्ट स्पिरिट असूनही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात आणि टाईमस्पेंड वाढवण्यात आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू.
सोनी मराठी वाहिनी, दशमी क्रिएशन ही निर्मितीसंस्था, सावित्री-जोतीची आमची सगळी टिम यांचे या ऎतिहासिक आणि दर्जेदार निर्मितीबद्दल मी मन:पुर्वक आभार मानतो. विशेषत: सोनी मराठी वाहिनीचे अजय भाळवणकर, सोहा कुलकर्णी, Sohaa D. Kulkarni, किर्तिकुमार नाईक, Kirtikumar Ojasvini, राजेश पाठक, Rajesh Pathak, दशमीचे नितीन वैद्य, Nitin Vaidya, निनाद वैद्य, Ninad Vaidya व अपर्णा पाडगावकर, दिग्दर्शक उमेश नामजोशी, प्रमुख कलावंत, ओंकार गोवर्धन, Omkar Govardhan, अश्विनी कासार, Ashwini Kasar, पूजा नायक, Pooja Nayak, मनोज कोल्हटकर, Manoj Kolhatkar, लेखक अभिजीत शेंडे,Abhijeet Shende, प्रसाद ठोसर, Prasad Thosar, निर्मिती प्रमुख, (क्रियेटीव्ह हेड) लेखा त्रिलोक्य, Lekha Trailokya, सोहम देवधर, Soham Deodhar आणि या टिममधील पडद्यामागील सहकारी, तंत्रज्ञ या सर्वांचा मी कृतज्ञ आहे. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही….
– प्रा. हरी नरके,
संशोधन सल्लागार,
“सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती”