सांगली : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. ‘आ देखे जरा किसमे कितना हैं दम…जमके रखना कमद मेरे साथीया’, असं ट्वीट करत संजय राऊत यांनी ईडी नोटिशीनंतर पलटवार केला होता. याबाबत आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
‘संजय राऊत ट्वीट करत असतात, त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे… त्यांना अनेक शेर-गाणी पाठ आहेत. राऊत यांना दुसरं काम नसतं त्यावेळी ते शेर आणि गाणं ट्वीट करत असतात.. त्याच्यावर मी उत्तर कशाला देऊ? मी ईडी प्रवक्ता नाही त्यांनाच विचारा. कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही, चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे काम नाही,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली. तसंच वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचीही माहिती आहे.
* भाजपच्या इतर नेत्यांनीही केला घणाघात
ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवल्यानंतर होत असलेल्या चर्चेबद्दल भाष्य करत भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. पीएमसी संदर्भात राऊत यांचे आधी काही संबंध होते का याचा खुलासा राऊत करतील का? त्यांनी ईडीला सहकार्य करावं, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर दुसरीकडे, भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनीही संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मुंबई पोलीस यंत्रणा वागते त्याचे समर्थन शिवसेना करते आणि ईडी नोटीस आली की सूडाचं राजकारण असं कसं म्हणतात? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.