सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. भारत भालकेंचे पुत्र भगिरथ भालकेंना वेटींगवर ठेवून पुढच्यावेळीस उमेदवारी दिली जाणार असल्याचेही चर्चा आहे.
राष्ट्रवादीच्या एका नेत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याने या चर्चांना दुजोरा मिळत आहे. परंतु, यावर शरद पवार यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, त्यामुळे संभ्रम वाढला आहे.
भारत भालके यांच्या निधनामुळे उमेदवारीचा मोठा प्रश्न राष्ट्रवादीसमोर उभा ठाकला आहे. भारत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालके यांना उमेदवारी दिल्यास सहानुभूती मिळेल. परंतु त्यांना अनुभव नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे येथे राष्ट्रवादी धोका घेण्यास तयार नाही. तर पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास भाजपचे नेते प्रशांत परिचारक निवडणुकीतून माघार घेतील. तसेच अनेक राजकीय समीकरणे जुळून येतील, आणि राष्ट्रवादीचा विजय सोपा होईल, असा कयासही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वर्तवला जात आहे. यास आणखी कोणाचाच अधिकृत दुजोरा नाही.
आमदार भारत भालकेंच्या जाण्याने पंढरपूर मतदारसंघाची मोठी हानी झालीय. यामुळे लोकांची प्रचंड भावनिक झाले आहेत. त्यांचे पुत्र भगिरथ भालकेंचा रिक्त जागेवर बिनविरोध आमदार करण्याची मागणी होत आहे. अशातच पार्थ पवारांची चर्चा सुरु झाली आहे. भावनिक आणि सहानुभूतीच्या वातावरणात पार्थ पवारांच्या नावास स्थानिक लोक किती स्वीकारतील, हाही एक विषय आहेच. भालके पुत्राचे पोटनिवडणुकीत विचार झाल्यास बिनविरोध होण्याचीही शक्यता आहे. मात्र पार्थ पवारांचा विचार झाल्यास विरोधक उपरा उमेदवाराच्या नावाचा ठपका ठेवून निश्चितच प्रतिस्पर्धी उमेदवार उभा करतील, अशी भीतीही आहेच.
दरम्यान, भगीरथ यांची विठ्ठल कारखान्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुढच्या वेळी उमेदवारी देण्यात येईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. तसेच अनेक विकासकामे मार्गी लागतील, असेही बोलले जात आहे.
भारत भालकेंची उर्वरित टर्ममध्ये त्यांची राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी हा पर्यायावर विचार सुरू झाला आहे. भारत भालके हे थेट जनतेचे आमदार म्हणून जशी त्यांची ओळख होती. तसे त्यांनी त्यांचा वारसदार ही तयार केलेला नव्हता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक प्रश्न तयार झाले असून त्यांच्या ताब्यात असलेला विठ्ठल कारखानाही आधी अडचणीतून बाहेर काढावा लागेल असे स्पष्ट वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.
* यांनी केली मागणी, चर्चा झाली चालू
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी कर्मवीर औदुंबर पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरजित पाटील यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढ्यात 35 गावांचा पाण्याचा प्रश्न , पंढरपूरची MIDC अशा मागण्या पूर्ण न झाल्याने पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास अनेक वर्षाचे प्रश्न सुटतील असे वाटत असल्याने अमरजित पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे पार्थ यांच्या उमेदवारीबाबत मागणी केली आहे.