नवी दिल्ली : हिंदू समाजासाठी केलेल्या कामाबद्दल आणि हिंदू संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल भारतीय वंशाच्या दहा अमेरिकी तरुणांचा ह्युस्टन येथे सत्कार करण्यात आला. या दहा जणांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे कौतुक केल्याची माहिती हिंदूज ऑफ ग्रेटर ह्युस्टन (एचजीएच) या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.
वल्लभ प्रीती सेवा समाज या संस्थेच्या वतीने १९ डिसेंबरला दहाव्या वार्षिक पारितोषिक प्रदान समारंभात या दहा तरुणांना गौरविण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘या तरुणांच्या सत्कारामुळे संपूर्ण परदेशस्थ भारतीय समुदायालाच विशेषत: तरुणांना आपल्या मूळ स्थानाशी असलेले संबंध दृढ करण्याची संधी मिळणार आहे. आपली गौरवशाली ओळख जगाला करून देण्यात हे युवक हातभार लावतील, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात व्यक्त केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेता-दिग्दर्शक नितीश भारद्वाजही या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी म्हटले की, जगभरात कोणत्याही देशात गेले तरी हिंदूनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या संस्कृतीचे पालन करण्यासह त्या -त्या देशातील इतर परंपरामधील चांगल्या गोष्टीही आत्मसात केल्याचे त्यांनी म्हटले.
* हे आहेत दहा तरुण
अनीश नायक (सेवा इंटरनॅशनल), अनुषा सत्यनारायण (इटर्नल गांधी म्युझिअम ऑफ ह्युस्टन), नित्या रमणकुलंगार (श्री मीनाक्षी टेम्पल सोसायटी), संदीप प्रभाकर (ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ डिव्हिनिटी), कृती पटेल (बीएपीएस), विपश्चित नंदा (आर्य समाज), अभिमन्यू अग्रवाल (हिंदू हेरिटेज यूथ कॅम्प) आणि रजित शहा (वल्लभ विद्या मंदिर) अशी या तरुणांची नावे आहेत. याखेरीज नमिता पल्लोड (सनातन हिंदू धर्म) आणि कोमल लुथरा (यंग हिंदूज ऑफ ग्रेटर ह्युस्टन) यांना विशेष पुरस्कार देण्यात आले. करोनाकाळात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी डॉ. मदन लुथरा (वय ७३) यांना ‘अखिल चोप्रा अनसंग हिरोज अवॉर्ड’ने गौरविण्यात आले.