पुणे : राज्यातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एक अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो काढल्याच्या घटनेनं जुन्नर तालुका हादरला आहे. यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक नराधम फरार आहे.
तांबे या पश्चिम पट्ट्यातील, आदिवासी समाजातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या कारणावरून तीन युवकांवर पॉस्को अर्थात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक आणि अनुचित जाती जमाती अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर आदिवासी समाज संघटना बिरसा ब्रिगेड आक्रमक झाली आहे. बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर आंदोलन केलं.
या गंभीर आणि निंदनीय घटनेची फिर्याद पीडित मुलीनं सोमवारी (28 डिसेंबर ) जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दिली. मात्र या घटनेचे तिव्र पडसाद तांबे गावात आणि शिवारात उमटले आहेत. परिस्थितीवर जुन्नर पोलीस लक्ष ठेवून आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रविवारी (20 डिसेंबर) पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीची मुलगी या शिवणकामासाठी गावातील एका दुकानात गेल्या होत्या. दुकानातून घरी परत येत असताना आरोपी सौरभ वाळुंज आणि त्याचा मित्र करण यांनी त्यांचा पाठलाग केला. बैलगाडा घाटाच्या वरच्या बाजुला असलेल्या एका ज्वारीच्या मळ्याजवळ दोघांनी पीडित मुलीला ओढत शेतात नेले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याशिवाय पीडित मुलीचे फोटो काढून या घटनेबाबत कुणाला सांगितले तर फोटो सर्वत्र प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यामुळे केवळ भीतीमुळे पीडित मुलीने कोणालाही सांगितले नाही.घटनेनंतर दोन्ही तरुण आणि त्याचा मित्र आदित्य गुलाब कबाडी याच्या दुचाकीवरून फरार झाले.
घटना पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर मुलीच्या आईने संबंधित मुलीला विश्वासात घेत विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलीनं संबंधित तरुणांची नाव सांगून घडलेला प्रकार आईला सांगितला. दरम्यान रविवार ( 27 डिसेंबर ) रोजी या घटनेबाबत विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे आणि जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. जुन्नर पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
” या प्रकरणी सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. करण शिवाजी वाळूंज हा आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. तिन्ही आरोपी तांबे गावातीलच आहेत”
मंदार जावळे – उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर