नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्याने राज्यातील ग्रामीण भागातील गावोगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील एका घटनेने मात्र राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणूका या चुरशीने लढवल्या जातात. नव्हे तर त्या प्रतिष्ठे च्या असतात. नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) येथे चक्क सरपंच पदाचा जाहीर लिलाव करून 2 कोटीची बोली लावणा-या पॅनलकडे ग्रापंचायत बहाल करण्यात आली आहे.
उमराणे गावची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे. पण गावक-यांनी मंदिर बांधकामसाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ग्रामसभा आयोजित केली होती. येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात समस्त ग्रामस्थांनी या सभेत सहभाग घेतला. सभेत रामेश्वर महाराज मंदिर बांधकामासाठी लिलाव बोली लावण्यात आली. बोली जिंकणाऱ्यास सरपंच पद बहाल करण्यात येणार होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासतात्या देवरे यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व उमराणे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रशांत (चंदूदादा) विश्वासराव देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलन हा लिलाव जिंकला. या पॅनलने मंदिरासाठी 2 कोटी 5 लाखाची बोली लावली होती.
कांदा बाजार समितीमुळे उमराणे गाव नावारूपाला आले आहे. यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार रितसर गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात लिलावात बोली लावण्यात आली.
१ कोटी ११ लाखांपासून सुरु झालेल्या लिलाव हा २ कोटी ५ लाखावर पोहोचला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. लिलावाचा हा पैसा रामेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे.
लिलाव पार पडल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. ठरल्यानुसार बोली जिंकणाऱ्या पॅनलकडे ग्रामपंचायतीचा कारभार गेला आहे. कळवण सटाणा देवळा मालेगांव पंचक्रोशीत प्रथमच असा निर्णय झाला आहे.
* लिलावाची रक्कम दान
नाशिकमधील उमराणे गाव सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. येथील गावकऱ्यांनी राजकारण्यांना एक अनोखी ऑफर देऊ केली आहे. आम्हाला दारु, मटण किंवा पैसे नकोत. त्याऐवजी ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करा आणि बिनविरोध निवडून या, असा प्रस्ताव गावकऱ्यांनी राजकारण्यांसमोर मांडला होता.
तेव्हापासून नाशिकमधील या ऑफरची राज्यभरात चांगली चर्चा सुरु होती. बिनविरोध निवडणुकीसाठी झालेल्या लिलावात सरपंचपदासह ग्रामपंचायतीमधील विविध पदांसाठी 2 कोटींची रक्कम निश्चित झाली. लिलावाची ही रक्कम ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरासाठी दान करण्यात येणार आहे.