नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या विकासाच्या मुद्यावर टीका केली आहे. मोदी सरकारच्या काळात विकास केवळ मोठ्या उद्योगपतींचाच झाला. काही उद्योगपतींची कर्जे या मोदी सरकारने माफ केली आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. मोदी सरकारने 23,78,76, 0000000 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगपतींचे कर्ज माफ केले. या पैशात कोरोनामुळे संकटात आलेल्या कुटुंबियांची मदत करता आली असती. प्रत्येक कुटुंबियांना 20-20 हजार रुपये देता आले असते, असा उल्लेखही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केलाय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षात उद्योगपतींचे 23,78,76, 0000000 कर्ज माफ केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात एवढ्या पैशातून देशातील 11 कोटी कुटुंबांना महिन्याला 20-20 हजार रुपये देता आले असते. मात्र, तसे घडले नाही. हाच मोदींच्या विकासाचा खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बुधवारच्या बैठकीपूर्वी राहुल गांधी ट्विट करुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते. मोदी सरकारची आश्वासने कशी पोकळ निघालीत याची पोलखोल त्यांनी केली. मोदी सरकारने प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचंही आश्वासन दिलं होतं. त्यासाठी मला 50 दिवस द्या असं ते म्हणाले होते.
कोरोना आला तेव्हा आम्ही 21 दिवसात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू असं ते म्हणाले होते. आमच्या भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही, असंही ते म्हणाले होते. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. भाजप सरकार प्रत्येक वेळी विकासाचा पाढा वाचत असताना दुसरीकडे विरोधी पक्षाकडून विकासाचा ढोल खोटा ढोल वाजवला जात असल्याची टीका होत असते.