वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा करोना संसर्गाचे थैमान सुरू झाले आहे. करोनाबाधितांची आणि मृतांच्या वाढत्या संख्येमुळे जगात चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला असून मागील ४८ तासांमध्ये जवळपास ७ हजार ४६९ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेत बाधितांची संख्या एक कोटी ९७ लाखांच्या आसपास पोहचली आहे.
अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने काल गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत मागील २४ तासांमध्ये ३ हजार ७४४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, त्याआधी एक दिवसापूर्वीच करोनाने ३ हजार ७२५ जणांचे बळी घेतले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत वीस लाखांहून बालकांनाही करोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेतील करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत हजारो आरोग्य कर्मचारी व इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. अमेरिकेत फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या लशीला मंजुरी देण्यात आली आहे.
* जगभरात आठ कोटीहून अधिक कोरोनाग्रस्त
अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. एकट्या अमेरिकेत बाधितांची संख्या १ कोटी ९७ लाखांच्या आसपास पोहचली आहे. तर, ३ लाख ४२ हजारजणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
जगभरात करोनाबाधितांची संख्या ८ कोटी ३१ लाखांहून अधिक झाली असून १८ लाख १२ हजार ६४५ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे बाधितांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियात नव्या स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळले आहेत. ब्रिटनमध्ये नवा स्ट्रेन आढळल्यानंतर अनेक देशांनी ब्रिटनसोबतची विमानसेवा स्थगित केली आहे.