लखनौ : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील अनुपशहर पोलीस ठाण्यात तैनात महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह भाड्याच्या घरातील खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तिने पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत महिला शामली येथील रहिवासी होती. ती येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत राहात होती. घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसह अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शामली जिल्ह्यातील भैसवाल गावच्या आरजू पवार २०१५ मध्ये पोलीस दलात रूजू झाल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांपासून आरजू या अनुपशहर पोलीस ठाण्यात तैनात होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्या नेहरूगंजमध्ये नीरज शर्मा यांच्या घरात तिसऱ्या मजल्यावरील खोलीत भाड्याने राहात होत्या. तर दुसऱ्या मजल्यावर शर्मा हे कुटुंबीयांसह राहतात.
आरजू या शुक्रवारी ड्युटीवरही गेल्या नाहीत. त्या घरमालकाच्या घरीच जेवण करायच्या. काल शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घरमालकाने आरजू यांना जेवणासाठी आवाज दिला. मात्र, खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जवळच राहणारे अन्य पोलीस कर्मचारी सनी चौधरी यांना माहिती दिली. सनी तिथे आले. त्यांनी खुर्चीवर उभे राहून खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. आरजू यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला.