मुंबई : सेबीने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहाला दंड भरण्याचा आदेश दिला. सेबीने नोव्हेंबर २००७ मध्ये आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली. रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटींचा तर मुकेश अंबानींना १५ कोटींचा दंड केला आहे.
शेअर घोटाळा केल्याप्रकरणी सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा दंड केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड केला. तसेच नवी मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला २० कोटी रुपये आणि मुंबई सेझ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १० कोटी रुपयांचा दंड केला.
रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या नोव्हेंबर २००७ मध्ये झालेल्या शेअरच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी दोषी ठरवून सेबीने सर्व दोषींवर दंडात्मक कारवाई केली. दोषी ठरलेल्यांनी सामूहिकरित्या नोव्हेंबर २००७ मध्ये केलेल्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. गुंतवणूकदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी तसेच भविष्यात अशा स्वरुपाच्या घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्वांनाच योग्य तो इशारा देण्याकरिता सेबीने दोषींना दंड भरण्याचा आदेश दिला. सेबीचे अधिकारी बी जे दिलीप यांनी ९५ पानांच्या आदेशपत्रात कोणाला किती दंड आणि त्याची कारणे या संदर्भात सविस्तर माहिती नमूद केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मार्च २००७ मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचे ४.१ टक्के शेअर एका कंपनीला विकण्यात आले. काही काळानंतर ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहात विलीन झाली. मात्र शेअर खरेदीच्या एका व्यवहारामुळे बाजारात रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरची मागणी वाढली. मागणी वाढल्यामुळे रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढले. प्रत्यक्षात बनावट पद्धतीने मागणी निर्माण करण्यात आली होती. सामान्य गुंतवणूकदारांना २००७ मध्ये हा घोटाळा लक्षात येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या काळात वाढते महत्त्व लक्षात घेऊन सामान्य गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवली. पण बनावट मागणी निर्माण केली नसती तर सामान्य गुंतवणूकदारांनी आकर्षित होऊन रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली नसती. याच कारणामुळे फसवणुकीच्या उद्देशाने शेअर बाजारात गैरव्यवहार करणे, गुंतवणूकदारांची फसवणूक करणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वासघात करणे यासाठी सेबीने ठपका ठेवला. दोषींविरोधात सेबीने दंडाची कारवाई केली.
* सेबीने ठरवले दोषी
सामान्य गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील गैरव्यवहारांची कल्पना येणे शक्य नव्हते. याच कारणामुळे घोटाळा करुन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वासघात केल्याचा ठपका सेबीने दोषींवर ठेवला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याप्रकरणीही सेबीने कारवाई केली.