लखनौ : दिल्लीजवळच्या गाजियाबादमधील मुरादनगर भागात स्मशानात स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही दबले असण्याची शक्यता आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १८ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले आहेत असं गाजियाबादचे पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. प्रशासनातील अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर श्मशानघाटात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीचे छत कोसळल्याचे वृत्त आहे. अजूनही काही लोक ढिगाऱ्यात दबले गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर आणि दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ही दुर्घटना घडली आहे. मुरादनगरच्या स्मशानघाट परिसरात लिंटरचे बांधकाम सुरू होते. या वेळी पाऊस आल्याने लिंटर खाली कोसळले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या दुर्घटनेचे शिकार झालेले लोक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आले होते.
* अंत्यसंस्कारासाठी आलेले लोकही दबले
एका फळविक्रेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी लोक स्मशानभूमीत आले होते. मात्र अंत्यसंस्कारावेळी पाऊस आल्याने लोक छताखाली उभे राहिले होते. या छताचे बांधकाम सुरू होते. मुसळधार पावसामुळे हे छत खाली कोसळले आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक दबले गेले.
* आर्थिक मदत जाहीर
मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत म्हणून जाहीर केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर योग्य उपचार होतील याकडे लक्ष देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्रभावी पद्धतीने बचावकार्य चालवण्याचे निर्देशही आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.