नवी मुंबई : एकीकडे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरू असताना आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. नवी मुंबई विमानतळ नामांतरावरुन मनसे – शिवसेना समोरासमोर आले आहेत.
या विमानतळाला रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी मनसेने केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला मनसेने विरोध केला आहे. नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभे राहत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मनसेने पत्रकार परिषद घेत केली आहे. रायगड आणि नवी मुंबई मनसेकडून ही मागणी करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रातील एखाद्या भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे. मात्र, लोकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी केली आहे. तसेच, दि. बा. पाटील यांचे नाव द्यायची मागणी असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत जे राजकारण केले आहे, ते निंदनीय आहे, असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे.सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर काँग्रेस नेत्यांचे अधिक प्रेम आणि श्रद्धा असणार, याची मला खात्री आहे, असे सांगून भाजपचे कान टोचले.