जालना : औरंगाबादचं संभाजीनगर
असं नामकरण करण्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने ठामपणे विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे राज्यातील आणखी एक प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनीही औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील, असे सांगितले. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.
तोंडावरच या शहराच्या नामांतरावरून वादळ उठलं आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याबाबत सत्ताधारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असताना काँग्रेसने मात्र या नामांतरास ठाम विरोध केला आहे. यावरून शुक्रवारी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांवर टोलेबाजी केली होती. शिवसेना केवळ निवडणुकीपुरता या मुद्द्याचा वापर करत आली आहे. आताही तेच सुरू आहे. आम्ही मागणी करतो आणि तुम्ही विरोध करा, अशा पद्धतीने राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांची नुरा कुस्ती चालली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही, असे नमूद करताना औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. औरंगाबादचे नामांतर हा महाविकास आघाडी सरकारच्या समान किमान कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले.
* शिवसेना नक्कीच गोत्यात येईल
“औरंगाबादचं नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. परंतु हे तीन पक्षांचं सरकार आहे हे शिवसेनेनं विसरू नये. आघाडीचं सरकार कॉमन मिनिमम प्रॉग्रामच्या माध्यमातून चालतात. कोणाच्याही वैयक्तिक अजेंड्यावर नाही. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा काम करण्यासाठी आहे नावं बदलण्यासाठी नाही,” असं संजय निरूपम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं. “औरंगजेबचं व्यक्तीत्व वादग्रस्त राहिलं आहे. त्याच्या प्रत्येक बाबींशी काँग्रेस सहमत असेल हे आवश्यक नाही. छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धा होते. त्यांचं जीवनकार्य वंदनीय आहे. यावर कोणताही मतभेद नाही. परंतु सरकार चालवताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणत राहिली तर नक्कीच गोत्यात येईल. त्यांनी स्वत:च ठरवावं,” असंही ते म्हणाले.