मुंबई : औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.
औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे. त्यातच महाविकास आघाडीला बाहेरून पाठिंबा असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करताना नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले की, शहरांची जिल्ह्यांची नावे बदलून काही फायदा नाही. नामांतर करून विकास होत नाही. नामांतर करायचं असेल तर नवे जिल्हे निर्माण करा. त्यांना नाव द्या. औरंगाबाद, अहमदनगर यांची नावे बदलून उपयोग नाही. संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते रायगड जिल्ह्याला द्या, त्यापेक्षा महाराष्ट्राचे नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, असा सल्ला अबू आझमी यांनी दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा समोर आल्यापासून शिवसेनेची चौफेर कोंडी होत आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. तर विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि मनसे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत.
* संजय राऊतांची प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव बदलण्याचे राजकारण करू नये असेही अबू आझमी म्हणाले. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी अबू आझमी यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी हे समजूतदार नेते आहेत. अबू आझमींचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.