परभणी : मागील तीन दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. पुढचे पाच दिवस सर्वत्र ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच मराठवाड्यातील चार जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेली द्रोणीय स्थिती यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होऊन कोकण, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडतोय. हेच वातावरण पुढचे चार दिवस कायम राहणार असून मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि जालना जिल्ह्यात 7 जानेवारीला विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे आणि हेच ढगाळ वातावरण अजून चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून पुढचे चार ते पाच दिवस कोकणामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणे अपेक्षित आहे.
* नुकसानीची दाट भीती
बदलत्या वातावरणाचा परिणाम आंब्याच्या मोहरावर भुरी किंवा तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तर अवकाळी पावसामुळे काजूवर इमॉस्कोटो आणि करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावर कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या औषधांच्या फवारणीचा अवलंब करावा. शेतकऱ्यांनी काढणी केलेली तूर, फळपीक, हरभरा आदी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने केले आहे.