अकोला : महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार आरोपाची फैरी सुरु आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर प्रहार केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी टीका मिटकरींनी भाजपवर केली आहे.
भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
गुजरातची सत्ता किती काळ भाजपजवळ आहे?, एवढ्या दिवसात अहमदाबादच नाव का बदललं नाही?, असा सवाल करत भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं मिटकरी म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपा नेत्यांना सवाल केला आहे. गुजरातमधील अहमदाबाद या शहराचे नाव कर्णावती ठेवण्याचा करार करण्यात आला होता. गुजरातमध्ये गेली कित्येक वर्षांपासून भाजपाचेच सरकार आहे, मग अद्यापही अहमदाबादचे कर्णावती असे नामांतरण का झाले नाही? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे.
महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीला टार्गेट करण्याच षडयंत्र भाजप रचत आहे, असा आरोप यावेळी मिटकरी यांनी केला. भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एवढीच जर धमक असेल तर त्यांनी अहमदाबादच्या नामांतराविषयी मोदींशी बोलावं, असं मिटकरी म्हणाले.
* घोषणेची आठवण करुन दिली
1990 आणि 2001 मध्ये भाजपने घोषणा केली होती की आमची सत्ता आल्यावर अहमदाबाद शहराचं नाव बदलू… तिथं कित्येक वर्षे तुमचंच सरकार आहे, मग आजून अहमदाबादचं नाव कर्णावती का झालं नाही?, असं मिटकरी म्हणाले. तर भाजपच्या काळात कर्णावती झालं नाही तर गुजरातची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्या, दुस-याच दिवशी कर्नावती नाव आम्ही करुन दाखवू, असंही मिटकरी म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना चॅलेंज देत आमदार मिटकरी यांनी गुजरात आमच्याकडे द्या, आम्ही नाव बदलून दाखवतो, असं म्हटलंय. हवं तर तुमचं नाव देतो, असेही मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय.