भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयातील एक धक्कादायक माहिती समोर आलीय. आरटीआय कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकरांनी 2018 रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयातील फायर सेफ्टीविषयी माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने उत्तरात येथे ‘फायर सेफ्टी हायड्रन्ट्स, फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम, स्मोक अलार्म नाही’ असं म्हटलं होतं. जुलै 2020 रोजीही पुन्हा याची विचारणा केली असता ‘परिस्थिती जैसे थे’ असल्याचं समोर आलं होतं.
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आलीय.
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. तर आरोग्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटना प्रकरणात मोठी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माहिती अधिकारात असे समोर आले आहे की, २०१८ पासून रुग्णालयात कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नव्हती. भंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी २०१८ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सेफ्टीविषयी म्हणजेच आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात आग नियंत्रण यंत्रणा उपलब्धच नसल्याचं म्हटलं होतं.
२४ अॉक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या या उत्तरात प्रशासनाने म्हटलं होतं, फायर सेफ्टी हायड्रन्ट्स रुग्णालयात उपलब्ध नाही, फायर सेफ्टी स्प्रिंकलर्स सिस्टम रुग्णालयात उपलब्ध नाही, स्मोक अलार्म रुग्णालयात उपलब्ध नाही, तर फायर Extinguisher काही उपलब्ध आहेत तर काही उपलब्ध नाहीत.
Fire Hydrant – उपलब्ध नाही
Fire Sprinklers – उपलब्ध नाही
Smoke Alarm – उपलब्ध नाही
Fire Extinguisher – कधी भरले होते याची माहिती उपलब्ध नाही
Fire Escape Ladder, Fire Escape Routes: उपलब्ध नाही
धक्कादायक म्हणजे, ही माहिती प्रशासनाने २०१८ रोजी दिली होती आणि त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते विकास देवेंद्र मदनकर यांनी जुलै २०२० रोजी पुन्हा याबाबत विचारणा केली असता परिस्थिती जैसे थे असल्याचं समोर आलं. Fire Safety करिता अंदाजपत्रक व आराखडे प्रशासकीय मान्यता व निधी करिता वरिष्ठांना सादर केलेले आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली.
* आम्ही प्रयत्न केले पण वाचवू शकलो नाही
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या घटनेने देश हादरला आहे. मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वय 1 ते 3 महिन्यादरम्यान आहे. घटना घडली त्यावेळी नर्स ड्यूटीवर होती. धूर निघताना पाहून त्यांनी तत्काळ माहिती दिली, आम्ही खूप प्रयत्न केले आणि 7 बालकांना वाचवले, मात्र 10 चिमुकल्यांना वाचवू शकलो नाही, अशी माहिती येथील डॉक्टर प्रमोद खंडाते यांनी दिली.