भंडारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. येथे लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झालाय. या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पथकात मुंबई मनपातील अग्निशमन दल प्रमुख यांचा समावेश असेल. या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आग प्रकरणानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला भेट दिली. तसंच, या दुर्घटनेत जीव गमावलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबांचीही त्यांनी भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मी आता या कुटुंबीयांना भेटलो, यावेळी हात जोडून उभं राहण्याखेरीज माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते, कुटुंबीयांचे सांत्वन करता येईल असे शब्द निदान माझ्याकडे तरी नाहीयेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेवर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी केली. तसंच, या आगीत प्राण गमावलेल्या चिमुकलीचे पालक बेहरे यांची भेटही त्यांनी घेतली. या पालकांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ही दुर्घटना आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही समितीची स्थापना केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं ठाम आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.