मुंबई : भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘माझी सुद्धा सुरक्षा कमी करा’ अशी गुगली टाकून भाजप नेत्यांची बोलती बंद केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माजी मंत्री आणि विरोधकांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी ‘माझ्या सुरक्षेत कपात करावी’ अशी मागणीच केली आहे. ‘इतर नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, तर माझी सुद्धा सुरक्षा कमी करावी’, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारची बैठक पार पडली. या बैठकमध्ये कोण कोणत्या नेत्यांची सुरक्षा वाढवायची आणि कपात करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
मात्र, सुनेत्रा पवार यांना विशेष वेगळी सुरक्षा देण्यात आली नाही. उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांना सुरक्षा देण्यात आली आहे. यापूर्वीही उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नींना सुरक्षा पुरवण्यात आली होती, असं पवार कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.
* यांच्या सुरक्षेत केली वाढ
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर,दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आमदार वैभव नाईक हे नारायण राणे यांचे विरोधक आहे म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांना प्रथमच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसंच कोल्हापूरमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांची सुरक्षा वाढवली आहे.