सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रेसाठी मंदिर समितीने पाठवलेल्या प्रस्तावावरुन शनिवारी रात्री उशीरा प्रशासनाने आपले आदेश जारी केले आहेत. महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रा नियोजनाबाबत सात पानी आदेश जारी केला आहे.
कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध मर्यादा घालून धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना यात्रा काळात मंदिरात प्रवेश बंद असणार आहे. मात्र सर्व लोकप्रतिनिधींच्या मागण्या फेटाळत विभागीय आयुक्तांनी यात्रेवर निर्बंध घालण्याचा निर्णय अखेरीस घेतला आहे. विशेष म्हणजे निर्णय होण्याअगोदरच लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयासाठी चढाओढ लागली होती.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा कशी होणार याची चर्चा होत असतानाच महापालिका आयुक्तांनी यात्रा परवानगी कशी असेल याबाबतचा आदेश शनिवारी रात्री उशिरा पारीत केला.
यानुसार १२ ते १६ जानेवारी दरम्यान होणा-या यात्रेसाठी मंदिर भाविकांना बंद असणार असून जिल्हा व परराज्यातून भाविक येणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त आदेश जारी करणार आहेत. नंदीध्वज मिरवणूर रद्द करण्यात आली असून, धार्मिक विधीसाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने ११ डिसेंबर रोजी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर पोलीस आयुक्त व अधीक्षक कार्यालयाने अभिप्राय सादर केला होता. या अभिप्रायावरून शासनाकडून परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांना विनंती केली होती. जिल्हाधिका-यांनी १६ डिसेंबरला हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.
शासनाने २४ डिसेंबरला धार्मिकस्थळे सुरू करताना कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून घालून दिलेल्या नियमावलीनुसार विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हाधिका-यांनी निर्णय घ्यावा, असे कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांकडे यात्रेबाबत प्रस्ताव सादर केला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी पोलीस आयुक्त व अधीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून घातलेल्या अटींचे पालन करून परवानगी देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना ८ जानेवारी दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अनुषंगाने आयुक्त पी. शिवशंकर यांनी यात्रेतील नियम अटीचा आदेश जारी केला. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी रोजीच्या तैलाभिषेक म्हणजे यन्नीमज्जनसाठी नंदीध्वज मिरवणुकीला परवानगी नाही. पण ११ जानेवारी रोजी मानाचे सातही नंदीध्वज मंदिर परिसरात सजवून प्रत्येक नंदीध्वजासोबत ५ प्रमाणे ३५ व्यक्ती व १५ पुजारी अशा ५० जणांना मास्क, फिजीकल डिस्टन्स व सॅनीटायझरच्या वापरासह परवानगी दिली आहे. पंच कमिटीने दोन दिवस आधी ही नावे पोलिसांना द्यायची आहेत.
* अक्षता सोहळ्यास फक्त ५० जण
यात्रेच्या दुस-या दिवशी म्हणजे १३ जानेवारीला अक्षता सोहळा आहे. यानिमित्त मंदिरापासून संमतीकट्ट्यापर्यंत ७ नंदीध्वज आणण्यासाठी ३५ मानकरी व अक्षता सोहळ्यासाठी १५ पुजा-यांना परवानगी दिली आहे. हा कार्यक्रम संपल्यावर नंदीध्वज मंदिरात निश्चित केलेल्या जागी जातील अशाच पद्धतीने १४ जानेवारी रोजी तीळ, हळदीचे उटणे लेपन करून नंदीध्वजांना गंगास्नान करण्यासाठी योगदंडाच्या मानक-यांना परवानगी देण्यात आली आहे.
* मानक-यांना दिले जाणार ओळखपत्र
मानक-यांना पोलीस आयुक्तालयाचा पास राहणार आहे. परवानगीबाबत प्रशासनामार्फत ओळखपत्र देखील देण्यात येणार आहेत.
नागफणी, सजावटीस नाही परवानगी
नंदीध्वज मंदिर परिसरात निश्चित केलेल्या ठिकाणी राहतील. धार्मिक विधीसाठी मंदिर परिसरात नेण्यास परवानगी राहिल. नागफणी व इतर सजावट करून मिरवणुकीस बंदी असेल. होम विधीसाठी होम मैदानावर परवानगी असलेल्या ५० जणांना जाता येईल. १५ जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम व १६ जानेवारी रोजी होणा-या कप्पडकळ्ळी कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे.
*मंदिर राहणार बंद
यात्रा काळात श्री सिद्धेश्वर मंदिर बंद राहणार आहे. पंच कमिटीने भाविकांना लाईव्ह दर्शनाची सोय करावी. यात्रा काळात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी देवस्थानने परिसरात स्वत:चे सुरक्षा रक्षक नेमावेत. मंदिर परिसर व शहरात पोलीस आयुक्तालय स्वतंत्र बंदोबस्त लावतील.
* शोभेचे दारुकाम रद्द
यात्रेचा प्रमुख आकर्षण असलेल्या शोभेचे दारुकाम कार्यक्रम दरवर्षी 15 जानेवारी रोजी पार पडत असतात. यंदा मात्र शोभेच्या दारुकामासाठी प्रशासनाने परवानगी पूर्णपणे नाकारली आहे. तसेच यात्रेचा शेवटचा दिवस असलेल्या कप्पडकळी कार्यक्रम मिरवणुकीस देखील प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. नंदीध्वजाची नगर प्रदक्षिणा मिरवणूक न काढता प्रतिकात्मक स्वरुपात सिद्धरामेश्वर योगदंड घेऊन मंदिर परिसरात पार पाडावेत अशा सूचना सोलापूर महानगर पालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत.