मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे महान अभिनेता रजनीकांत हे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंदाचे भरते आले होते. रजनीकांत कुठल्या राजकीय पक्षाची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ते काही कारणास्तव जमले नाही. देशातील अनेक सेलिब्रेटींची उत्सुकता ताणली गेली आहे. आता तर रजनीकांत यांनी चाहत्यांना जे आवाहन केलं आहे त्यामुळे पुन्हा एक नवीन विषय समोर आला आहे.
रजनीकांत इतकी लोकप्रियता असणारा कलाकार देशात सापडणे अवघड आहे. या अभिनेत्याच्या नव्या सिनेमाच्या पहिल्या शो च्या वेळी त्याचे चाहते काय करतात हे सा-या देशाला ठाऊक आहे. त्यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालणे, हार घालणे, पूजा होम हवन करणे हे सुरु असते.
अशा कलाकारानं आपण राजकारणात प्रवेश करुन नव्या राजकीय पक्ष काढतो आहोत, असे जाहीर केले होते. पुढे हे सारे बारगळले. रजनीकांत यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही पाहिले जाऊ लागले होते. पण ऐनवेळी रजनीकांत यांनी माघार घेतल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्यानं काय सांगितले हे चांगले लक्षात आहे. त्यामुळे काही करुन रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा यासाठी आंदोलनं सुरु केली आहेत. लोकं रस्त्यावर आली आहेत. त्यांनी निदर्शनंही केली आहेत. यासगळ्या प्रकारामुळे रजनीकांत यांना मानसिक त्रास झाला असून त्यांनी त्याविषयी सोशल माध्यमांवर आपली भावना व्यक्त केली आहे.
* मला वेदना देऊ नका, आंदोलने करु नका
रजनीकांत यांनी 31 डिसेंबर रोजी राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. नव्या वर्षात होणा-या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा रजनीकांत यांचा निर्णय जवळपास पक्का झाला होता. रजनीकांत यांनी आपली भावना व्यक्त करताना असे म्हटले आहे की, राजकारणात येण्याचा निर्णय मी का रद्द केला, हे आधीच स्पष्ट केले आहे. कृपा करून माझ्यावर राजकारणात येण्यासाठी दबाव टाकू नका. मला वेदना देऊ नका. माझ्या राजकीय प्रवेशाचीच मागणी करत अशाप्रकारची आंदोलने करु नका.