सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेस आज तैलाभिषकाने प्रारंभ झाला. पोलिस बंदोबस्तात सिद्धेश्वरांच्या अक्षता सोहळ्यासाठी 68 दैवतांना आज ( लिंगांना तैला अभिषेक ) हिरेहब्बू यांनी योगदंड व सिद्धेश्वरांच्या पालखीसह व वाहनातून निमंत्रण दिले.
इतिहासातील यात्रेच्या नऊ-साडेनऊशे वर्षांच्या परंपरेला कोरोनामुळे पहिल्यांदाच छेद मिळाला असून, वाहनाच्या मदतीने नव्याने तयार करण्यात आलेली पालखी तैलाभिषेकाच्या सोहळ्यात दिसत होती. योगसमाधीसारखी आकर्षक फुलांची मेघडंबरीसह सजावट करण्यात आली असून, पालखी सोहळ्यातील २४ सेवेकऱ्यांना यंदा विश्रांती मिळाली आहे.
आज पहाटे चार वाजल्यापासून नंदीध्वजांच्या दर्शनासाठी भाविक येत होते. सकाळी साडेसहा वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्याला मोठा पोलिस बंदोबस्त लावला. हिरेहब्बू वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यांना बॅरेगेट लावले. भाविक व पत्रकारांना सोडले नाही.
हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नदीध्वजांना राजशेखर हिरेहब्बू व राजशेखर देशमुख यांनी पूजा केली. शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी मंत्र व आरती म्हटले. त्यानंतर होटगी मठाचे मल्लीकार्जून महास्वामी यांनी दर्शन घेतले. मानकरी जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू यांनीही दर्शन घेतले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मानकरी सुदेश देशमुख, संदेश देशमुख, सुधीर थोबडे, सिध्देश थोबडे, प्रथमेश हिरेहब्बू, प्रतीक थोबडे उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पूजा झाल्यानंतर चांदीची पालखी हिरेहब्बू यांच्या वाड्याच्या बाहेर आणली. हिरेहब्बू यांनी बग्गी मध्ये बसले आणि सिध्देश्वर मंदिराकडे ताफा निघाला. सुरवातीला पोलिसाची गाडी, बग्गी, पालखी रथ, दोन पोलिसांच्या गाड्या , मानकरी यांच्या दोन गाडया, पोलिसाची गाडी असा क्रम होता.
मनपा आयुक्तांनी यात्रेचा आदेश काढताना अनेक बंधने आणली आहेत. स्वतंत्र वाहनातून हिरेहब्बू मंडळी आज ६८ लिंगांना तैलाभिषेक करीत प्रदक्षिणा घालीत आहेत. वाहनाच्या अग्रभागी ट्रॅक्टरला जोडलेली पालखी आहे. पालखी सोहळ्यात चवरा, चांदीची छडी, अब्दागिरी, गोल छत्रीसह पालखीला खांदा देणारे सेवेकरी दिसून येत नाहीत. या सेवेकऱ्यांच्या भूमिकेत यंदा ट्रॅक्टर दिसला.
श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीदरम्यान शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंदिर परिसर व मिरवणूक मार्गावर तेराशे पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. नंदीध्वज मिरवणूक मार्गावरही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, परिसरात राहणाऱ्या चारशे नागरिकांना पासेस देण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट कॉर्नर, हरीभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्ता, सिद्धेश्वर कन्या प्रशालेसमोरील रस्ता, वनश्री नर्सरी, विष्णू घाट, गणपती घाट, सरस्वती कन्या प्रशाला, भुईकोट किल्ल्याच्या आतील परिसर, चार हुतात्मा पुतळा या परिसरामध्ये १२ जानेवारी रोजी रात्री १२ ते दि.१७ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या परिसरात तेराशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, सहा पोलीस निरीक्षक, १२ सहायक पोलीस निरीक्षक, २० फौजदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंदोबस्त असणार आहे. याशिवाय क्यूआरटी पथक असणार आहे.
“शासनाच्या आदेशावरून श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी आदेशाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल”
डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त.