पुणे : कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’कडे (एसआयआय) केंद्र सरकारने नोंदविली आहे. एक कोटी दहा लाख लसीच्या डोसचा हा खरेदी आदेश असून, आज पहाटे मंगळवारी सकाळपासून ही लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना केली गेली आहे.
या एका लसीच्या डोसची किंमत २०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पुणे एअरपोर्टवरुन आठ विमानांद्वारे कोरोना लस देशातील १३ ठिकाणी पाठवली जाईल. पहिले विमान दिल्लीसाठी रवाना होणार आहे. येत्या १६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिकारासाठी सिरम इन्स्टीट्युटने तयार केलेल्या ʻकोविशिल्डʼ या लसीचे चार कंटेनर आज देशांतर्गत वापरासाठी कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले. कंपनीचे मांजरी कार्यालय ते लोहगाव या वाहतुकीसाठी विशेष पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला होता.
पुणे विमानतळावरून कोविशील्ड लसीचे देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या भागात जाणार आहेदेशात प्रत्यक्ष लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
कोरोना महामारीवर उपयुक्त ठरणाऱ्या या बहुप्रतिक्षित लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आवश्यक ते सर्व सरकारी सोपस्कार पार पाडत ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी आजपासून उपलब्ध करून दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कंपनीच्या मांजरी येथील कार्यालयाच्या प्रांगणात, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंटेनरची पूजा केल्यानंतर या कोल्ड चेन व्हॅन लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्या. लोहगाव विमानतळावरून लगेचच देशातील विविध राज्यांमध्ये विमानांद्वारे या लसीची वाहतुक करण्यात येईल, अशी माहिती, सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात, या लसीचा वापर हा प्रामुख्याने कोरोना वॉरियर्ससाठी करण्यात येणार आहे. कंपनीला सुरवातीला, २ कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी ६५ लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. लस वाहतुकीसाठी विशेष प्रकारच्या कोल्ड चेन व्हॅन वापरण्यात आल्या. ही लस २ ते ८ अंश सेल्सियस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या व्हॅनमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वत:च्या आणि भाडे तत्वावरील व्हॅन लस वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या.
* मोरयाचा जयघोष, पेढे वाटून आनंद साजरा
सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनरपैकी तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेने पोलिस बंदोबस्तामध्ये रवाना झाले आहे. तर यापूर्वी इन्स्टिट्यूट च्या परिसरात कंटेनरची पूजा परि मंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून केली. तर यावेळी कंटेनर रवाना होताना. गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.
पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी रवाना झाले. ८ फ्लाईटपैकी २ फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गोवाहाटी येथे जाणार आहे.