मुंबई : राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप एका महिलेने केले आहेत. यावरून आता भाजपमधील नेते धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करू लागले आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. इतकंच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. मुख्यमंत्री बंगले लपवतात, तर त्यांचे मंत्री बायको लपवतात, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाल सर्व माहिती आहे” असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंच्या या फेसबुक पोस्टनंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इतकंच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवतात, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.
* मुख्यमंत्री कारवाई करणार?
उद्धव ठाकरे हे शालीन आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर अॅक्शन घेणार का हा सवाल आहे. थेट महिलेने केलेले गंभीर आरोप, पोलिसांमध्ये दिलेली तक्रार असा नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका कोणता पवित्रा घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
* शरद पवार काय भूमिका घेणार?
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही प्रमाण मानला जातो. जर शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना पायउतार होऊन येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल, जर निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामारो जावं लागेल.
* भाजप महिला मोर्चाही आक्रमक
महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंविरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे